छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : २,७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबवूनही शहरात वाढीव पाणी आणताना महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही कधी स्कोअर व्हॉल्व्ह निखळतो, तर कधी व्हॅक्युम पंप जळतो. त्यामुळे या योजनेतील यंत्रसामुग्रीच्या दर्जावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार १२ जून रोजी पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू होताच एकामागून एक तांत्रिक बिघाड समोर आले.
अखेर रविवारी सायंकाळी जॅकवेलवरील ३,७०० हॉर्सपॉवरचा एक पंप सुरू करून पम्पिंग सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सर्व यंत्रणा सुरळीत राहिल्यास, नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी साडेसात ते दहा एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती मनपाचे कार्यकारी अभियंता वसंत भोये यांनी दिली.









